हार्दिक पंड्या का घालत होता 228 नंबरची जर्सी, उलगडले 11 वर्षाचे रहस्य

पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने अतिशय कमी वेळात क्रिकेट विश्वात आपला प्रभाव पाडला आहे. त्याने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता. यानंतर त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सतत प्रभाव पाडला आणि टीम इंडियाचा एक अनिवार्य भाग बनला.

रतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही बर्‍याच वेळेस सांगितले आहे कि, संघाचे संतुलन राखण्यासाठी हार्दिक पंड्या किती महत्त्वाचा आहे. जेव्हा हार्दिक पंड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याने 228 क्रमांकाची जर्सी घातली. त्याच्या जर्सी नंबरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले पण काही काळानंतर त्याने आपला जर्सी क्रमांक बदलून 33 केला. दरम्यान, आता पंड्याच्या 228 नंबरच्या जर्सीचे रहस्य उलगडले आहे.

अलीकडेच आयसीसीने हार्दिक पंड्याच्या जर्सी क्रमांकाचे 228 चे चित्र शेअर केले आणि त्याबद्दल चाहत्यांना विचारले. आयसीसीने अष्टपैलूच्या जर्सीचा फोटो ट्वीट करून विचारले की, ‘हार्दिक पंड्याने 228 नंबरची जर्सी का घातली हे तुम्ही सांगू शकता का ?’ आयसीसीच्या या प्रश्नावर काही चाहत्यांनी या रहस्यावरील पडदा उलगडला. चाहत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले की, “अंडर -16 च्या दरम्यान हार्दिक बडोद्याकडून खेळायचा.

तो अंडर -16 मध्ये बडोद्याचा कर्णधार होता आणि संघाचा कर्णधार म्हणून त्याने शानदार द्विशतक झळकावले. या दरम्यान त्याने 391 चेंडूत 228 धावांची प्रभावी खेळी केली. हार्दिकने 2009 मध्ये रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर मुंबई अंडर 16 विरुद्ध हा डाव आठ तास खेळला होता. 16 वर्षांखाली खेळताना हे दुहेरी शतक त्याच्या संपूर्ण कारकीर्दीतील एकमेव दुहेरी शतक आहे. 2009 मध्ये खेळलेल्या या सामन्यात बडोद्याने केवळ 60 धावांत चार बळी गमावले. यानंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरला आणि दुहेरी शतकासह स्टार बनला. त्या सामन्यात हार्दिकने पहिल्या डावात 5 फलंदाजांनाही बाद केले.

बडोदा अष्टपैलू खेळाडू 2015 मध्ये आयपीएल संघ मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. पंड्या मुंबई इंडियन्सकडून तीन आयपीएल टायटलमध्ये संघाचा सदस्य होता. जर परिस्थिती सामान्य झाली असती तर हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असता, परंतु कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, हार्दिक पंड्या त्याच्या मागील दुखापतीमुळे बर्‍याच दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर होता. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो परतला. या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे धुऊन गेला. त्यांनतर कोरोना विषाणूमुळे ही मालिका रद्द करण्यात आली.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like