‘लॉकडाऊन’मध्ये ‘स्पा’ सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा ‘पर्दाफाश’, 8 जणांना अटक

सतना / मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊन असताना सतना जिल्हा मुख्यालयाजवळ एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशच्या सतना जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये छापा टाकून आठ तरुण आणि महिलांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.19) रात्री करण्यात आली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खजुरी टोला येथील एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्री पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून चार तरुणांसह चार तरुणींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लाख रुपयाची रोकड, दोन दुचाकी आणि 14 मोबाइल जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.