‘तसे न झाल्यास विराट कोहलीला सोडावे लागेल कर्णधारपद’, माजी फिरकीपटूचे विधान

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहलीला 2017 च्या सुरुवातीला माजी विकेटकिपर महेंद्रसिंग धोनीच्या जागी संघाचा पूर्ण-वेळ कर्णधार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून तो क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात कर्णधारपद सांभाळत आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर विराट भारतात परतल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. त्याच्या नेतृत्वात संघाने चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियामध्ये दुसर्‍या वेळी कसोटी मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयाचे श्रेय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीलाही दिले. भारताला आता पुढील एक-दोन वर्षांत दोन मोठे आयसीसी टूर्नामेंट खेळायचे आहेत. दरम्यान, इंग्लंड संघाचा माजी फिरकीपटू मोंटी पनेसरने विराटच्या कर्णधारपदाबाबत मोठे विधान केले आहे.

माजी डावखुरा फिरकीपटू म्हणाला, “विराट कोहलीने कर्णधार म्हणून भारतातील एकदिवसीय किंवा टी – 20 विश्वचषक जिंकला नाही तर त्याला कर्णधारपद सोडावे लागेल.” मोंटी पनेसरच्या म्हणण्यानुसार, “जर तसेच घडले नाही, तर त्याच्या कर्णधार पदावर बरेच प्रश्न निर्माण होतील. ” तो कर्णधारपद चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे, पण त्याला घरीच होणाऱ्या दोन वर्ल्ड कपपैकी एक विजेतेपद मिळवावे लागेल.

विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी बजावली आणि इंग्लंडचा लॉर्ड मैदानात होणाऱ्या अंतिम सामन्यात स्थान मिळविण्याच्या अगदी जवळ आहे, पण संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकदाही आयसीसी स्पर्धा जिंकली नाही. माजी विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून आयसीसीचे जेतेपद जिंकले होते. विराटच्या नेतृत्वात संघ 2017 मध्ये चॅम्पियन्स करंडक आणि 2019 मध्ये होणार एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यास चुकला.

ऑस्ट्रेलियामधील भारताच्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या विजयाबद्दल मोंटी पनेसर म्हणाला की, ही एक रंजक चर्चा आहे. माझ्या मते रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा त्यांनी एक उत्तम कामगिरी बजावली. आता हे विराट कोहलीवर अवलंबून आहे की तो दोन्ही लीडर्सला कसे मॅनेज करतो. ही आता त्याच्या कर्णधारपदाची खरी कसोटी असेल.”