COVID-19 मुळं ‘क्रिकेट’मध्ये झाले मोठे बदल ! ‘कसोटी’मध्ये कोरोना ‘सबस्टिट्यूट’ला मिळाली मान्यता, चेंडूवर लाळ लावण्यास बंदी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यामुळे क्रिकेटला ब्रेक लावण्यात आला आहे. आता हळू हळू पुन्हा क्रिकेटचे सामने सुरू करण्याच्या मार्गावर वाटचाल सुरु आहे. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसी क्रिकेट समितीने दिलेली शिफारस आयसीसीने मान्य केली आहे आणि आता कोरोना विषाणूची लागण झाल्यास कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूला सबस्टिट्यूट घेण्याची परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त, चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरण्यावरील तात्पुरती बंदी देखील मंजूर झाली. खेळाच्या नवीन नियमांनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोरोना साथीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासामधील लॉजिस्टिक आव्हानांचा उल्लेख करत स्थानिक पंचांना द्विपक्षीय मालिकेत मान्यताही दिली.

यात एका निवेदनात म्हटले आहे की जर कसोटी सामन्यादरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसली तर सबस्टिट्यूट खेळाडूला मैदानात उतरवण्याचा पर्याय असेल. कनकशन सबस्टिट्यूट म्हणून सामना रेफरी हा पर्याय मंजूर करतील. तसेच हा नियम वनडे किंवा टी-20 मध्ये लागू होणार नाही असेही म्हटले आहे.

अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीने या सूचना दिल्या होत्या कारण क्रिकेट पुनर्संचयित झाल्यानंतर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि सामन्यांच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकेल. हा नियम इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात 8 जुलैपासून होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून लागू होईल. ही मालिका प्रेक्षकांशिवाय घेतली जाईल. विशेष म्हणजे मार्चनंतर ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे.

यासह प्रत्येक डावात अतिरिक्त डीआरएस रिव्ह्यू देखील मंजूर करण्यात आला आहे. आता प्रत्येक संघ कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक डावात तीन रिव्ह्यू घेण्यास सक्षम असेल. हा निर्णय या गोष्टीला विचारात घेऊन घेण्यात आला आहे की सद्य परिस्थितीत असे प्रसंग येऊ शकतात जेव्हा कमी अनुभवी पंच सेवा देत असतील.