‘कोरोना’च्या तपासणीसाठी ‘आधार’ किंवा ‘मतदान’ कार्ड गरजेचं, लोक बोगस पत्ता देतायेत तर कसं होणार संक्रमण ‘ट्रेस’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोनाची तपासणी करणार्‍यांना आता आधार, वोटर आयडीसारखी सरकारी कागदपत्रे दाखवावी लागतील. आता संबंधित व्यक्तीने दिलेल्या मोबाईल नंबरचीही पडताळणी ताबडतोब केली जाणार आहे. अचूक देखरेखीसाठी आयसीएमआरच्या संचालकांच्या निर्देशानंतर दिल्ली सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत. मुख्य सचिव विजय देव यांच्याद्वारे जारी तपासणी आदेशात म्हटले आहे की, सरकारकडून जारी ओळखपत्र दाखवल्यानंतरच तपासणीची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येईल.

दिल्ली एनसीआरसोबत देशातील इतर शहरातून वृत्त येत आहेत की, लोक तपासणी करताना आपला पत्ता आणि मोबाईल नंबर चुकीचा देत आहेत. ज्यामुळे तपासणी रिपोर्ट आल्यानंतर ते सांगितलेल्या पत्त्यावर सापडून येत नसल्याने त्यांच्या ट्रेसिंगमध्ये अडचण येत आहे. दिल्ली सरकारकडून जारी आदेशानुसार जर एखाद्या रूग्णाची ट्रेसिंग होऊ शकत नसेल तर त्याच्याकडून संसर्गाचा धोका आणखी वाढतो. ज्या उद्देशासाठी टेस्टींग केली गेली त्यास काहीच अर्थ राहात नाही.

दिल्लीत कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे काही दिवसांपासून कमी झाल्याचे दिसत आहे. अगोदर प्रत्येक दिवशी तीन हजारपेक्षा नवी प्रकरणे येत होती. परंतु मागील काही दिवसांपासून ही संख्या 2500पेक्षा कमी झाली आहे. गुरुवारी सुद्धा दिल्लीत 2373 प्रकरणे समोर आली. अशाप्रकारे दिल्लीत एकुण संक्रमितांची संख्या आता 92 हजारच्या पुढे गेली आहे. तर यामध्ये 63 हजार लोक बरे झाले आहेत.

गुरुवारी रात्री दिल्ली सरकारने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, 2373 नव्या प्रकरणांसह एकुण संख्या आता 92 हजार 175 वर पोहचली आहे. यापैकी 63 हजार 7 लोक उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. दिल्लीत सध्या कोविड-19 चे 26 हजार 304 सक्रिय रूग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 2864 लोकांचा मृत्यू झाला आहे.