फिल्मी स्टाईलमध्ये लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच दागिने आणि रोकड घेऊन पळून गेली ‘नवरी’

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये नवीन नवरी घरी आल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. रात्री तिने आपल्या हाताने स्वयंपाक बनवून घरातील सर्व सदस्यांना खायला दिले. स्वयंपाक करताना त्यात नशायुक्त पदार्थ मिसळला. बेशुद्ध अवस्थेत झोपलेल्या नातेवाईकांचा फायदा घेऊन नवरी दागिने आणि घरातील रोकड घेऊन फरार झाली. ही काही चित्रपट कथा नसून वास्तव आहे.

या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी सीकरच्या ढाणी मोकसिंहवाली येथील रहिवासी मुकेशचे लग्न झाले होते. लग्न करण्यासाठी दोन दलालांनी नवरदेवाकडून २ लाख २० हजार रुपये देखील घेतले. जेव्हा नवरदेवाचे कुटुंब उशिरापर्यंत उठले नाही, तेव्हा शेजार्‍यांना संशय आला.

शेजार्‍यांनी घराच्या आत जाऊन पाहिले, तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्ध पडले होते. घरात नवरी दिसली नाही. ग्रामस्थांनी नवरदेव मुकेश, नानकराम, कमला, मीना, दिव्या आणि अनुज यांना सरकारी कपिल रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली.

या प्रकरणी मुकेशने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ढाणी मोकसिंहवाली येथील रहिवासी मुकेशचे १३ जुलै रोजी दोन दलालांमार्फत दिल्लीच्या नांगला गावच्या दिव्याशी लग्न झाले होते. रात्री उशीरा नवरीला घरी आणले.

कुटुंबातील सदस्यांनी १४ जुलै रोजी सर्व कार्यक्रम केले. रात्री नवरीने कुटुंबासाठी स्वयंपाक केला. त्यात तिने नशायुक्त पदार्थ मिसळला आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना दिले. रात्री प्रत्येकजण त्यांच्या खोलीत जाऊन झोपला. ज्यानंतर नवरी दागिने आणि रोकड घेऊन फरार झाली.