Video : भारतीय नौदलाच्या युध्दनौकेने US नेव्हीच्या टँकरमधून भरून घेतलं इंधन, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण संबंध किती चांगले आहेत, याची झलक तेव्हाही दिसली, जेव्हा अरबी समुद्रात भारतीय युद्धनौकाने अमेरिकेच्या नेव्हीच्या टँकरकडून इंधन घेतले. वास्तविक संरक्षण कराराच्या तरतुदीनुसार सोमवारी भारतीय नौदलाच्या युद्धनौकाने उत्तर अरबी समुद्रात अमेरिकेच्या नौदलाच्या टँकर यूएसएनएकडून इंधन भरले.

भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘उत्तर अरबी समुद्रात मोहिमेवर तैनात असलेल्या आयएनएस तलवारने लेमोआ अंतर्गत अमेरिकन नेव्हीच्या ताफ्यातील टँकर यूएसएनए युकोनकडून इंधन घेतले.’ २०१६ मध्ये भारत आणि अमेरिकेने लॉजिस्टिक एक्सचेंज करारावर (लेमोआ) स्वाक्षरी केली होती. त्याअंतर्गत दोन्ही सैन्य दुरुस्ती व इतर सेवा संबंधित गरजांसाठी एकमेकांच्या अड्ड्यांचा वापर करतील. भारताने फ्रान्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि जपानबरोबर असे करार केले आहेत.

एका वृत्तसंस्थेनुसार, भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण संबंध गेल्या काही वर्षांत सातत्याने मजबूत होत आहेत. दोन्ही देशांनी २०१८ मध्ये आणखी एक संरक्षण करार COMCASA म्हणजे कम्युनिकेशन कॉम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी ऍग्रिमेंट वरही स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये दोन देशांच्या सैन्यामध्ये सहकार्य आणि अमेरिकेकडून भारताला उत्कृष्ट तंत्रज्ञानाची विक्री करण्याची तरतूद आहे.

यावर्षी जुलैमध्ये भारतीय नौदलाने अमेरिकेच्या नेव्ही कॅरियर स्ट्राइक समूहासह अंदमान-निकोबारमध्ये सैन्य सराव केला होता. यात यूएसकडून परमाणू शक्तीने सज्ज असलेल्या एअरक्राफ्ट कॅरियर यूएसएस निमित्झने देखील भाग घेतला होता. तसेच या सैन्य सरावात भारतीय नौदलाच्या ४ युद्धनौकांनीही भाग घेतला होता.

भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याच्या ट्विटर हँडलने इंधन भरत असलेल्या युद्धनौकेची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील प्रसिद्ध केले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे वैशिष्ट्य या व्हिडिओमध्ये समजू शकते.