कोंगोमध्ये UN च्या ताफ्यावर हल्ला; इटलीच्या राजदूतासह बॉडीगार्ड, ड्रायव्हरही ठार

कोंगो : वृत्तसंस्था –  कोंगोमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये इटलीचे राजदूत लुका अट्टानासिओ यांची हत्या करण्यात आली. ते संयुक्त राष्ट्राच्या ताफ्यात कांगोचा प्रवास करत होते. त्यादरम्यान हा हल्ला झाला. त्यांच्यासोबत त्यांचा अंगरक्षक आणि वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. याबाबत इटली सरकारकडून सांगण्यात आले, की लुका अट्टानासिओ यांच्यासह तीन जणांची गोमा येथे हत्या केली.

किनशासाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमाजवळ वर्ड फूड प्रोग्रामसाठी जाणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या लुका अट्टानासिओ यांचा मृत्यू झाला. नॉर्थ किवू प्रांतात सेनेच्या प्रवक्त्याने सांगितले, की या हल्ल्यात दोघांची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये बॉडीगार्ड आणि अट्टानासिओ यांच्या ड्रायव्हरची हत्या करण्यात आली.

लुका अट्टानासिओ यांची हत्या झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की मृतांमध्ये इटलीच्या पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. डीआरसी येथे 2018 मध्ये नियुक्त केलेले अट्टानासिओ यांच्या पोटात गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले जात होते. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.