पिळदार मिशा ठेवल्याच्या कारणावरुन राजस्थानमध्ये दलित व्यक्तीचा खून

बीकानेर : वृत्तसंस्था –   पीळदार मिशा ठेवल्याच्या कारणावरुन एका दलित व्यक्तिचा खून केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या बिकानेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. आरोपींनी दलीत व्यक्तीच्या डोक्यात गोळी घालून खून केला.

तपास अधिकारी आणि पोलीस उप अधीक्षक ओमप्रकाश चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीली दिलेल्या माहितीनुसार, मृतक प्रदीपकुमार हे फतोही गावचे रहिवासी होते. ते मेघवाल समाजातील असून त्याला स्थानिक लोकांच्या एका गटाने लढण्याचे आव्हान दिले होते. मयत प्रदिपकुमार हे हिंदुमलकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खतालबाना गावातील लक्ष्मीनारायण वितरण पुलाजवळ पोहचले असताना स्थानिक लोकांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रदीपकुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी मयत प्रदीपकुमार यांच्या एका पुतण्याला मारहाण करण्यात आली होती. तसेच प्रदीपकुमार यांनी पिळदार मिशा ठेवल्यामुळे लोक संतप्त झाले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मयत प्रदीपकुमार याचे वडील पोलाराम मेघवाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कपिल चौहान, मानव आणि नरेश नाईक यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या गुन्ह्यातील आरोपी भानू सिंह हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फारार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.