Independence Day : भारत चांगला मित्र आणि जागतिक ‘पावर’, स्वातंत्र्यदिनी अमेरिकेहून आला शुभेच्छाचा ‘संदेश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत आज ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने जगाकडून शुभेच्छा येत आहेत. अमेरिकेनेही भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी भारतीयांना त्यांच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देताना म्हटले की, अमेरिका आणि भारत यांच्यात मैत्री आणि सामायिक लोकशाही परंपरेमुळे घनिष्ट संबंध आहेत.

पोम्पीओ भारताला शुभेच्छा देताना शुक्रवारी आपल्या संदेशात म्हटले की, ‘अमेरिकन सरकार आणि अमेरिकन जनतेच्या वतीने मी भारतीय लोकांना त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. ७३ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते, तेव्हापासून अमेरिका आणि भारत यांच्यात मैत्री आणि सामान्य लोकशाही परंपरेमुळे जवळचे संबंध आहेत.’

ते म्हणाले की, कालांतराने हे संबंध विकसित होऊन समग्र जागतिक पातळीवर सामरिक भागीदारीपर्यंत पोचले आहेत. २१ व्या शतकात दोन्ही देशांचे जागतिक सुरक्षा आणि समृद्धीच्या महत्त्वपूर्ण बाबींवर घनिष्ट संबंध आहेत. तसेच अमेरिका आणि भारत संरक्षण, दहशतवादाशी सामना करण्यासाठी, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, पर्यावरण, आरोग्य सेवा, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षण, अवकाश, समुद्र आणि इतर अनेक बाबींवर एकत्र काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

पोम्पीओ म्हणाले की, ‘या वर्षाच्या सुरुवातीस मी म्हटल्याप्रमाणे अमेरिका आणि भारत एकमेकांना महान बहुलतावादी लोकशाही, जागतिक शक्ती आणि चांगले मित्र म्हणून पाहतात. मी भारतीय जनतेला त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.’