TV डिबेटमध्ये आचार संहिता लागू करण्यासाठी जारी करावी एडव्हायजरी, ‘या’ पक्षानं केली मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कॉंग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी गुरुवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाला वृत्तवाहिन्यांच्या चर्चेवर आधारित कार्यक्रमांमध्ये ‘सभ्यता’ पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने आचारसंहिता लागू करण्यासाठी सल्लामसलत करण्याचे आवाहन केले. त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, वाहिन्यांच्या वादविवादात एकमेकांवर चिखलफेक थांबवण्यासाठी आणि सभ्यता आणण्यासाठी आचारसंहिता असणे आवश्यक आहे.

बऱ्याच कॉंग्रेस नेत्यांनी शेरगिल यांच्या विचाराचे समर्थन केले. पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते आनंद शर्मा यांनी ट्वीट केले की, ‘न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन’ (एनबीए) च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत आहे आणि सुधारणांची आवश्यकता आहे. उल्लेखनीय आहे की, शेरगिल यांनी जावडेकरांना हे पत्र त्यावेळी लिहिले आहे जेव्हा एका दिवसापूर्वीच कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यागी बुधवारी संध्याकाळी एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या वादविवाद आधारित कार्यक्रमात सामील झाले होते आणि या कार्यक्रमाच्या काही वेळानंतरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या काही मिनिटांनंतरच गाझियाबादमधील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून प्रश्न केला की, “कधीपर्यंत विषारी वादविवाद आणि विषारी प्रवक्ते संयम व साधेपणाचा जीव घेतील? कधीपर्यंत फाळणीचे विष या देशाला कायम ठेवेल? कधीपर्यंत?”