100 आंतरराष्ट्रीय ‘गोल’चा आकडा पार करणारा जगातील दुसरा ‘फुटबॉलर’ बनला रोनाल्डो

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नेशन्स लीगमध्ये मंगळवारी पोर्तुगाल आणि स्वीडन यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय गोल केला. पोर्तुगालने सामना 2-0 ने जिंकला आणि क्रिस्टियानो रोनाल्डोने संघासाठी दोन्ही गोल केले. रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल करणारा दुसरा फुटबॉलपटू आहे, याआधी इराणच्या अली देईने अशी कामगिरी केली आहे. हाफटाइमच्या काही वेळ आधी रोनाल्डोने फ्री-किकच्या माध्यमातून सामन्यातील पहिला गोल केला.

35 वर्षीय रोनाल्डोने सामन्याच्या 45 व्या आणि 72 व्या मिनिटाला गोल केले. रोनाल्डोने 2004 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला होता. ग्रीसविरुद्ध युरो चषक दरम्यान हा गोल केला होता. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याचा विक्रम सध्या अलीच्या नावावर आहे ज्यांनी 109 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. रोनाल्डोच्या खात्यात सध्या 101 आंतरराष्ट्रीय गोल आहेत.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर मलेशियाचे मोख्तार दहारी आहेत. ज्यांच्या खात्यात 86 गोल आहेत. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीविषयी बघितले तर ते या बाबतीत 15 व्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 70 आंतरराष्ट्रीय गोल आहेत.