बिहारमध्ये पुन्हा बनू शकतं NDA चं सरकार, भाजपाला सर्वाधिक जागा, जाणून घ्या कोणत्या पक्षाला मिळू शकतात किती जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पुढील पाच वर्ष बिहारमध्ये कोण सत्ता काबीज करणार, हे 10 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल, परंतु आणखी एका जनमत सर्वेक्षणानुसार, बिहारमध्ये एनडीए सरकार पुन्हा सरकार स्थापन करताना दिसत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार 243 जागांच्या विधानसभेत एनडीएला 135-159 जागा मिळू शकतात, तर महागठबंधनला 77 ते 98 जागा मिळू शकतात. जेडीयूपेक्षा जास्त जागा लढवणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ 1-5 जागांवर समाधान मानावे लागू शकेल. वोट शेयरविषयी बोलायचे झाल्यास एनडीएला 43% मते मिळू शकतात तर महागठबंधनला 35% मते मिळू शकतात. लोक जनशक्ती पक्षाला 4 % तर इतर खात्यात 18 % मते मिळताना दिसत आहेत. माहितीनुसार 1 ते 23 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या ओपिनियन पोलसाठी 30 हजार 678 लोकांचे मत घेण्यात आले आहे. बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर निकाल 10 नोव्हेंबर रोजी येतील.

भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळतील

ओपिनियन पोलनुसार या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल. भाजपाला 73 ते 81 जागा मिळू शकतात, तर नितीशकुमार यांच्या नेतृत्वात असलेल्या जेडीयूला 59 ते 67 जागा मिळू शकतात. व्हीआयपी 3-7 तर हमला 0-4 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, महागठबंधनमध्ये राजदला 56-64 जागा मिळू शकतात, तर कॉंग्रेसला 12-20 जागांवर समाधान मानावे लागेल. लेफ्टला 9-14 जागा मिळवताना दिसत आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात लोकप्रिय कोण ?

ओपिनियन पोलमध्ये लोकांना मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या पसंतीविषयी विचारले असता 15 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना 30 % लोकांनी पहिली पसंती असल्याचे म्हंटले आहे. तर 20 % लोकांना तेजस्वी यादव यांना पुढचे मुख्यमंत्री म्हणून पहायचे आहे. चिराग पासवान यांना 14% लोक तर सध्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना केवळ 10% लोक मुख्यमंत्री बनताना पाहू इच्छित आहेत.

नितीश यांच्यावर नाराज?

बिहारमध्ये नितीशकुमार 15 वर्षांपासून कारभार पाहत आहेत. बर्‍याचदा, प्रदीर्घ कारकिर्दीनंतर सत्ता विरोधी लाटेचा सामना करावा लागतो. ओपिनियन पोलमध्ये मुख्यमंत्री नितीश यांच्यावर लोकांच्या नाराजीबाबतही प्रश्न विचारले गेले. त्याला उत्तर म्हणून आलेल्या आकडेवारीमुळे नितीश यांच्या अडचणी वाढू शकतात. 60 टक्के लोकांनी असे सांगितले की ते नितीशकुमारांवर रागावले आहेत आणि मुख्यमंत्री बदलू इच्छित आहेत. 26% लोक म्हणाले की ते नितीशवर रागावले आहेत पण त्यांना पुन्हा संधी द्यायची आहे. तर 14 टक्के लोक नितीश यांच्यावर ना रागावलात ना त्यांना बदलू इच्छित आहेत.

बेरोजगारी सर्वात मोठी समस्या

यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? लोक कोणत्या मुद्द्यावर मतदान करतील? या प्रश्नाच्या उत्तरात, 52% लोक म्हणाले की त्यांच्यासाठी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. दुसरीकडे, 11 टक्के लोक भ्रष्टाचार आणि 10 टक्के लोक म्हणाले की रस्ता आणि वीज ही सर्वात मोठी समस्या आहे, तर 8% लोकांसाठी शिक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.