ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या वाहनाचालकांची आता खैर नाही; मोदी सरकार उचलतंय ‘हे’ पाऊल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वाहन चालवताना आपण अनेकदा वाहतुकीचे नियम पाळतो तर काही जण सर्रासपणे नियमभंग करतात. पण आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना मोठा फटका बसणार आहे. कारण केंद्र सरकार देशातील हायवे आणि शहरी ट्रॅफिकच्या जगात डिजिटल युगाची सुरुवात करत आहे. त्यानुसार राज्यांचे पोलिस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘हायटेक’ बनवण्याचा विचार सुरु आहे.

केंद्र सरकारच्या या नव्या नियमानुसार, पोलिस, वाहतूक पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांच्या शरीरात ‘बॉडी कॅमेरा’ लावला जाण्याचा विचार आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. राज्यांचे पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांना हायटेक बनवण्यासाठी त्यांच्या वाहनांच्या डॅशबोर्डवरही सीसीटीव्ही कॅमेरा, हायवे-जंक्शनवर स्पीड कॅमेरा यांसारखी डिजिटल उपकरणे लावण्याची योजना आहे. बॉडी कॅमेरातून चित्रित केले गेले ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यायालयात पुरावा म्हणून सादर केला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या चौकात किंवा हायवेवर गाड्या अडवून बेकायदेशीर पैसे घेणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनाही चाप बसणार आहे.

ऑडिओ-व्हिडिओ पुरावा म्हणूनही ग्राह्य धरणार

याबाबत मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की लाल सिग्नल, ओव्हर स्पीड, नो पार्किंग, सीट बेल्ट, हेल्मेट यासंदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटनांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. हे ऑडिओ-व्हिडिओ न्यायालयात पुरावा म्हणूनही ग्राह्य धरले जाणार आहे.

डॅशबोर्डवर सीसीटीव्ही कॅमेरा

पोलिस आणि सरकारी वाहनांच्या डॅशबोर्डवर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. या वाहनांच्या माध्यमातून स्पीडची मोजणीही केली जाईल. राज्यांच्या राजधानी आणि 10 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या शहरांतही अशा स्वरूपाची व्यवस्था लागू केली जाणार आहे.