पाकिस्तानच्या सिंधमध्ये भीषण अपघात, रेल्वे क्रॉसिंगवर बसला ट्रेनने उडवले, 20 लोकांचा मृत्यू

इस्लामाबाद : वृत्त संस्था – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असलेल्या प्रवासी बसला ट्रेनने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक मीडियाने ही माहिती दिली आहे.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, ही दुर्घटना सुक्कुर जिल्ह्यातील रोहरी परिसरात घडली. कराचीहून सरगोधाकडे निघालेली प्रवासी बस मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत असताना बसला पाकिस्तान एक्सप्रेसने जोरदार धडक दिली.

डॉनच्या रिपोर्टनुसार, सुक्कुरचे आयुक्त शफीक अहमद महेसर यांनी म्हटले की, दुर्घटनेत आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी घटनेची माहिती घेतली आणि मदतकार्यासाठी पथके पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

45 अप पाकिस्तान एक्सप्रेस ट्रेन कराचीहून रावळपिंडीकडे निघाली होती. तर, बस 20 प्रवाशांना घेऊन पंजाबकडे निघाली होती. पाकिस्तानची वेबसाइट जियो टीव्हीनुसार मरणार्‍यांची संख्या 19, तर डॉन डॉट कॉमने मृतांची संख्या 20 असल्याचे म्हटले आहे.

सुक्कुर जिल्हा पोलीस दलाचे एआयजी डॉ. जमील अहमद यांनी डॉन न्यूजला सांगितले की, ही एक भीषण दुर्घटना आहे, ट्रेनने उडवताच बसच्या चिंधड्या उडाल्या आणि तीचे तीन तुकडे झाले. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रेनने बसला सुमारे 150-200 फुट फरफटत नेले.