पेट्रोल-डिझेलवर अधिक कर का ? पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं उत्तर, सोनिया गांधींवरही पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या मोठ्या वाढीबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकार इंधनावर अधिक कर का आकारत आहे, हे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि महामारीशी लढा देण्यासाठी संसाधनांची गरज यासारख्या कारणांचा उल्लेख करून त्यांनी विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आरोपांवर पलटवार करत विचारले की, काँग्रेसशासित राज्यांनी टॅक्स का वाढवला आहे? सोबतच असेही म्हटले की, मोदी सरकार तिजोरी भरत नाहीये. गरिबांना अन्नधान्य आणि पैसे देत आहे.

या महिन्यात ७ जूनपासून तेलाच्या किंमतींमध्ये वाढ सुरू झाली, त्यानंतर डिझेलची किंमत २३ दिवसांत २२ वेळा वाढली, तर पेट्रोलची किंमत २१ वेळा वाढली आहे. दिल्लीत या महिन्यात आतापर्यंत डिझेलच्या दरात प्रतिलिटर ११.१४ रुपयांची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या किंमतीत ९.१७ रुपये वाढ झाली आहे.

प्रधान म्हणाले, “जेव्हा जेव्हा आपल्या देशात विकास, आरोग्य इत्यादीसाठी संसाधनांची गरज असते, तेव्हा सरकार असे (कर वाढ) करते. सरकार या वाहिन्यांमधून जे काही पैसे वसूल करते, ते राज्य सरकारांना दिले जाते. पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली गेली. गरिबांना धान्य देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जोडले गेले. तिजोरी भरण्यासाठी पैशाचा वापर केला गेला नाही. मोदीजींच्या योजनेत तिजोरी भरणे नाही, लोकांमध्ये पैसे वाटणे आहे.”

तेलाच्या किंमती वाढण्याचे कारण सांगून येत्या काही दिवसांत किंमती स्थिर होतील असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रधान म्हणाले, “जगाबरोबर भारतीय अर्थव्यवस्थाही आव्हानात्मक काळातून जात आहे. कोविड-१९ मुळे उर्जा उद्योगासाठी कठीण काळ आहे. एप्रिल-मेमध्ये पेट्रोलच्या मागणीत ७०-८० टक्क्यांनी घट झाली, त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर झाला.”

भविष्यात स्थिर होतील किंमती

भविष्यात किंमती वाढण्याच्या अंदाजाबाबत ते म्हणाले, “आता पुन्हा एकदा मागणी वाढत आहे. तेलाच्या किंमतींचा अंदाज कोणीच लावू शकत नाही, पण आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती स्थिर झाल्या की भारतातही किंमती लवकरच स्थिर होतील, असा आमचा अंदाज आहे.”

‘काँग्रेसशासित राज्यांनी ५ रुपये कर वाढवला’

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आरोपांवर पलटवार करत विचारले की, कॉंग्रेस राज्यांनी इंधनावरील करवाढ का केली? पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर मागे घेण्याच्या सोनिया गांधींच्या मागणीवर प्रधान म्हणाले, “सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की केंद्र सरकार तिजोरी भरत आहे. राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, झारखंड आणि पुद्दुचेरी या कॉंग्रेस शासित राज्यांनी इंधनावरील ५ रुपयांचा कर वाढवून जनतेवर ओझं टाकले आहे, हे त्या विसरल्या असतील.”

‘सरकार तिजोरी भरत नाही, गरीबांमध्ये वाटत आहे’

मंत्री म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत २० जूनपर्यंत ६५,४५४ कोटी रुपये ४२ कोटी लोकांच्या खात्यात जोडले गेले आहेत. प्रधान म्हणाले, “मोदींनी डीबीटीमार्फत गोरगरीबांच्या खात्यात पैसे जोडले, पण तुम्ही (सोनिया गांधी) ते राजीव गांधी फाउंडेशनच्या खात्यात जोडले. तुमची संस्कृती तिजोरी लुटण्याची आहे. मोदीजी गरीब, गरजू लोक आणि मध्यमवर्गीयांवर खर्च करतात. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. आम्ही कोरोना संकटामध्ये सावधगिरी बाळगत आहोत. यामुळे भारत ज्या पद्धतीने संकटाला तोंड देत आहे त्याचे कौतुक होत आहे.”