राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला निवडणूक, MP मधून ज्योतिरादित्य शिंदे मैदानात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि राजस्थान या ठिकाणी राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनरोजी मतदान होणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोन व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. या जागांवर असलेल्या प्रतिनिधींचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक आयोगाने 3 एप्रिल रोजी आदेश जारी केला होता. या आदेशात पुढील आदेश येईपर्य़ंत सर्व जागांसाठीच्या निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते.

राज्य सभेच्या 18 जागांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेनंतर मतदान न झाल्यामुळे हि प्रक्रिया लांबली होती. यामध्ये आंध्र प्रदेशातील 4, झारखंडमधील 2, मध्य प्रदेश 3, मणिपूर 3, राजस्थान 3, गुजरात 4 आणि मेघालयमध्ये 1 जागेसाठी निवडणूक होत आहे.

मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे रिंगणात
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी 13 मार्च रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सध्या मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि भाजपचे प्रभात झा आणि सत्यनारयण जटिया हे राज्यसभेचे खासदार आहेत. या तीन खासदारांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. काँग्रेसने राज्यसभेसाठी खासदार दिग्विजय सिंह यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.