‘या’ महिन्यात सुरू होवु शकतं राम मंदिराचं बांधकाम ! PM नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि CM योगी राहणार उपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्येत लवकरच राम मंदिराचे बांधकाम श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून सुरू केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने तारीख निश्चित करण्यासाठी अयोध्येत बैठकही घेण्यात आली. ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधानांना आमंत्रण पाठवल्याची पुष्टी केली. उद्याच्या बैठकीत मंदिर बांधकाम सुरू करण्याची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर बांधकाम समितीचे सभापती नृपेंद्र मिश्रादेखील उद्याच्या या बैठकीत उपस्थित असतील. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळापत्रकानुसार दिलेल्या तारखेची माहिती दिली जाईल.

राम मंदिर बांधकाम सुरु होण्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतही उपस्थित असण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रामजनभूमीवरील बांधकाम ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर बांधण्याचा सोहळा अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या मान्यवरांसह साजरा केला जाणार होता, पण कोविड-१९ च्या प्रसारानंतर या यादीमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच काही मंत्री आणि प्रदेशातील खासदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी म्हटले की, सिंह गेट येथे पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जो योग्य सोहळा नव्हता. ते म्हणाले की, मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी गर्भगृहात भूमिपूजन केले जाईल. ही मंदिराच्या बांधकामाची औपचारिक सुरुवात आहे, यासाठी आमंत्रणे पाठवली गेली आहेत.

भगवान राम यांच्या जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधणे हा भारतीय जनता पक्षासाठी एक मुद्दा बनला आहे, कारण हे पक्षाच्या जाहीरनाम्यात दोन दशकांपासून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी ९ नोव्हेंबर रोजी रामजन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली होती.