Ram Navami 2021 : 9 वर्षानंतर उद्या रामनवमीला बनतोय असा आश्चर्यकारक योगायोग ! ‘या’ पध्दतीनं करा हवन, जाणून घ्या विधी अन् हवनाची शुभ वेळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   चैत्र नवरात्रीच्या समारोपाला आता एक दिवस बाकी आहे. यावर्षी राम नवमी उद्या म्हणजे 21 एप्रिलला साजरी केली जाईल. धर्मशास्त्रानुसार, रामनवमीच्या दिवशी श्रीरामाने राजा दशरथाच्या घरी जन्म घेतला होता. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा करण्यासह हवनसुद्धा केले जाते. रामनवमीच्या दिवशी हवन केल्याने शुभ फलप्राप्ती होते असे म्हटले जाते. राम नवमीला हवन-पूजेचा शुभ मुहूर्त, हवन साहित्य आणि विधी जाणून घेवूयात…

राम नवमीला हवनचा शुभ मुहूर्त –

–  हिंदू पंचांगानुसार 21 एप्रिलला रामनवमी रात्री उशीरा 12 वाजून 43 मिनिटांनी सुरू होईल. जी 22 एप्रिलच्या सकाळी 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत राहिल.

–  पूजा मुहूर्त : 21 एप्रिलच्या दिवशी सकाळी 11 वाजून 2 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांपर्यंत राहील.

–  पूजेचा एकुण कालावधी – 2 तास 36 मिनिटे.

हवन साहित्य –

रामनवमीला हवन करण्यासाठी लिंबू, पंचमेवा, नारळ, गोला, जव, आंब्याचे लाकूड, उंबराची साल, चंदनाचे लाकूड, अश्वगंधा, मुलेठीचे मुळ, कापूर, तिळ, तांदूळ, लवंग, गाईचे तूप, वेलची, साखर, नवग्रहाचे लाकूड, आंब्याची पाने, पिंपळाची साल, अर्जुन साल, बेल, इत्यादीचा समावेश करावा.

हवन विधी –

राम नवमीला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. यानंतर हवनसाठी स्वच्छ ठिकाणी हवन कुंड तयार करा. आता गंगाजल शिंपडून सर्व देवतांना आवाहन करा. आता हवन कुंडात आंब्याची लाकडे आणि कापूराने अग्नी प्रज्वलित करा. यानंतर हवन कुंडात सर्व देवी- देवतांच्या नावाने आहुती टाका. धार्मिक मान्यतेनुसार, हवनकुंडात किमान 108 वेळा आहुती टाकावी. हवन संपल्यानंतर श्रीराम आणि सीता मातेची आरती करा.