आठवले यांनी आझाद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उंचावल्या सर्वांच्या भुवया; वाचा काय म्हणाले आठवले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यावर बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘तुम्हाला राज्यसभेत पुन्हा यायला हवे. जर काँग्रेस आणत नसेल तर आम्ही तुम्हाला परत आणण्यास तयार आहोत. या सभागृहाला तुमची गरज आहे’, असे ते म्हणाले.

गुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यावर आठवले यांनी भाष्य केले. तसेच तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत वक्तव्य केले. त्यामध्ये ते जुन्या आठवणी काढून भावूक झाले होते. मोदींनी जम्मू-काश्मीरच्या त्या घटनेचे उदाहरण दिले त्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात गुजरातच्या अनेकांचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

देशासह सभागृहाची चिंता करणारे आझाद : पंतप्रधान

गुलाम नबी आझाद असे नेते आहेत, ते आपल्यासह सभागृह आणि देशाची काळजीही करतात. विरोधी पक्षनेते पदावर असताना त्यांनी कधी आपली प्रतिष्ठा मिरवण्याचा प्रयत्न केला नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

…तर आम्ही आझाद यांना पुन्हा आणू : आठवले

गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. पण तरीही त्यांनी सभागृहात पुन्हा यावं. जर काँग्रेस त्यांना पुन्हा आणणार नाही तर आम्ही ते करण्यास तयार आहोत. या सभागृहाला त्यांची गरज आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.