भाजप प्रवेशापूर्वीच 88 वर्षीय ‘मेट्रो मॅन’ श्रीधरन म्हणाले, ‘मला केरळचा मुख्यमंत्री बनायचंय, राज्यपाल नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन हे पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. यामागे त्यांचा प्रमुख उद्देश आहे, की केरळमध्ये सरकार स्थापन करणे आणि केरळच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच जर येत्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला तर राज्याला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढणे.

ई. श्रीधरन यांनी पुढे सांगितले, की जर पक्षाने सांगितले तर मी विधानसभा निवडणूक लढवेन आणि पक्षाने सांगितले तर मी मुख्यमंत्रिपदही सांभाळेन. पण राज्यपालपद सांभाळण्यात मला कोणताही रस नाही. राज्यपालपद हे पूर्णपणे संविधानिक पद आहे. त्यामध्ये कोणतीही पॉवर नसते. त्यामुळे या पदावर राहून सकारात्मक योगदान देता येऊ शकणार नाही. त्यांनी पुढे सांगितले, की माझा मुख्य हेतू भाजपची सत्ता केरळमध्ये आणणे हा आहे. जर भाजप केरळमध्ये निवडणूक जिंकते तर तीन-चार असे काही क्षेत्र होतील, ज्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करू इच्छितो. यामध्ये मोठ्या प्रमाणात आधारभूत संरचनाचा विकास आणि राज्यांत उद्योगांना आणण्याचा समावेश असेल.

अर्थ आयोगाची स्थापना करणार
राज्य सध्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. मोठ्या प्रमाणात देणं बाकी आहे. प्रत्येकावर 1.2 लाख रुपयांचे कर्ज आहे. म्हणजेच आम्ही दिवाळखोरीच्या दिशेने जात आहोत. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अर्थ आयोगाची स्थापना करण्यात येईल, असेही ते म्हणाले.