नागपूरमध्ये 47 तर अमृतसरमध्ये तापमान 44 डिग्रीवर, विदर्भासह देशातील काही ठिकाणी ‘रेड अलर्ट’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   एकीकडे देशात कोरोना संसर्गामुळे लोक हैराण आहेत, लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत, तर दुसरीकडे उन्हाचा कडाचा वाढत आहे. विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशासह देशातील बर्‍याच भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या विविध भागात तापमान रेकॉर्ड ब्रेक करत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील चोवीस तास या उन्हाच्या कडाक्यापासून आराम मिळण्याची कोणतीही आशा नाही.

नागपुरात पारा 47 डिग्रीच्या वर

कोरोना बाधित महाराष्ट्रातील बर्‍याच ठिकाणी तीव्र उष्णता जाणवत आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येथे कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आहे. मंगळवारी नागपुरात 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमृतसरचे तापमान 44 डिग्रीच्या पुढे

पंजाबमध्ये परिस्थिती काही वेगळी नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अमृतसरमधील तापमान आज 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. असा अंदाज होता की येथील तापमान 32 डिग्री सेल्सियस ते 44 डिग्री सेल्सियस पर्यंत राहू शकते. चंदीगड आयएमडीचे संचालक सुरेंद्र पॉल म्हणाले, पंजाब आणि हरियाणामध्ये येत्या 3-4 दिवसांत तापमानात वाढ दिसून येईल. तापमान 45 डिग्रीपेक्षा जास्त होईल. जास्तीत जास्त तापमान प्रामुख्याने पंजाब आणि हरियानाच्या दक्षिण पश्चिम भागात राहील. तसेच पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये उष्णतेच्या लाटा सुरु राहण्याची शक्यता आहे.

हरियाणा, राजस्थान, विदर्भासाठी रेड अलर्ट

हवामान खात्याचे वैज्ञानिक डॉ नरेश कुमार म्हणाले की, देशातील बर्‍याच भागात उष्णता खूपच जास्त वाढत आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती असू शकेल. हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि राजस्थानसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान 2 दिवसांनंतर तापमान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भोपाळमध्ये तापमान 45 डिग्रीवर

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. असा अंदाज होता की, इथले तापमान 43 ते 45 दरम्यान पोहोचू शकते. नागरिक प्रादेशिक हवामान केंद्राचे एम.एल. साहू म्हणाले, पुढील 3 दिवस विदर्भासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाचव्या दिवशी तापमान कमी होऊ शकते. पश्चिम आणि उत्तर मध्य प्रदेशासाठी 2 दिवसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी अपेक्षा आहे की, तीन दिवसानंतर येथे तापमान कमी होईल. छत्तीसगडमध्ये पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.