‘बनावट’ मार्कशीटव्दारे पोलिस दलात मिळवली नोकरी, निवृत्तीनंतर झाला ‘पर्दाफाश’

भोपाल : वृत्तसंस्था – पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने बनावट कागदपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर उजेडात आल्याने मध्य प्रदेश पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कपिलदेव सिंह असे बनावट कागदपत्रे सादर करून पोलीस दलात नोकरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कपिलदेव सिंह याच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपिलदेव सिंह यांनी बनावट मार्कशीटच्या आधारे मध्य प्रदेश पोलीस दलात नोकरी मिळवली होती. त्यांनी पोलीस दलात 38 वर्षे नोकरी केली असून 2018 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान बिहार मधील नालंदा येथील अखिलेश सिंह यांनी पोलीस अधीक्षकांकडे याची तक्रार केली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर कपिलदेव सिंह यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अखिलेश सिंह यांच्या मुलीचा विवाह कपिलदेव सिंह यांच्या मुलासोबत झाला होता. अखिलेश यांनी यापूर्वी कपिलदेव सिह आणि त्यांच्या मुलावर मुलीचा खून केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात दोघांना अटक झाली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीनावर सोडले होत. त्यानंतर अखिलेश यांनी एप्रिलमध्ये कपिलदेव सिंह यांनी बनावट मार्कशीटच्या आधारे मध्य प्रदेश पोलीस दलात नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी रणवीर सिंह यांनी सांगितले की, तक्रारीनंतर पटना येथील रसूलपुर येथील श्री शंकरसिंह हायस्कूलमध्ये एक पथक पाठवण्यात आले होते. कपिलदेव सिंह यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 1971 मध्ये या शाळेतून इयत्ता आठवीची परीक्षा दिली होती. मात्र, चौकशीमध्ये कपिलदेव सिंह यांनी या शाळेतून परीक्षा दिली नसल्याचे समोर आले. तसेच शाळेने देखील कपिलदेव सिंह यांनी परीक्षा दिली नसल्याचे सांगितले.

तपास अधिकारी रणवीर सिंग यांनी पुढे सांगितले की, आरोपी कपिलदेव सिंह याने 1980 मध्ये खरगोन येथे पोलीस कॉन्टेबल म्हणून जॉईन झाले. 2018 मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पोलीस दलात नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कपिलदेव सिंह हा फरार झाला आहे.