Russian Coronavirus Vaccine : ‘कोरोना’ वॅक्सीन लॉन्च केल्यानंतर रशियानं केला दावा – ‘2 वर्ष स्पर्श देखील करू शकणार नाही व्हायरस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाने जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीसाठी ‘स्पुतनिक व्ही’ नावाची लस तयार केली आहे. हे औषध पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा राष्ट्रपती पुतीन यांनी केला आहे. मात्र जगातील अनेक तज्ञ ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याच्या त्यांच्या दाव्यावर प्रश्न करत आहेत. आता एका ज्येष्ठ रशियन अधिकाऱ्याने या लसीबाबत नवीन दावा केला आहे. रशियाच्या उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना लस ‘स्पुतनिक व्ही’ किमान दोन वर्षे कोरोना विषाणूपासून संरक्षण प्रदान करेल. एका वृत्तसंस्थेनुसार, गामालेया संशोधन केंद्राचे संचालक अलेक्झांडर गिंटसबर्ग म्हणाले, ‘रशियाच्या कोरोना लसीचा परिणाम फक्त सहा महिने किंवा एक वर्ष राहणार नाही, तर दोन वर्ष त्याचा परिणाम राहील आणि व्हायरसपासून दूर ठेवेल.’

अलेक्झांडर गिटसबर्ग हे गामालेया रिसर्च सेंटर आणि एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक आहेत. कोरोना व्हायरस लस विकसित करणारी हीच ती संस्था आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जगातील पहिल्या कोरोना लसीची पहिली तुकडी दोन आठवड्यांतच दाखल होईल. आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको यांनी बुधवारी सांगितले की, ‘कोरोनो विषाणू संसर्गाविरूद्ध लसीचे पहिले पॅकेजेस येत्या दोन आठवड्यांत प्राप्त होतील.’ त्याचबरोबर जगातील अनेक देशांतील तज्ञ रशियाच्या कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. डब्ल्यूएचओने गेल्या आठवड्यात लसीची घाई करण्याबाबत इशारा दिला होता, तर अमेरिकेचे उच्च आरोग्य तज्ञ ऍंथोनी फौची यांनी लसीबाबत रशिया आणि चीन या दोघांवरही योग्य प्रक्रिया पाळण्याबद्दल शंका व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी संस्था रशियाच्या संपर्कात आहे.

‘इतर देशांनाही उपलब्ध केली जाईल लस’
यापूर्वी रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको म्हणाले की, कोविड-१९ विरुद्ध विकसित केलेली लस निश्चितच प्रभावी आहे आणि इतर देशांनाही ती उपलब्ध करुन दिली जाईल, पण देशांतर्गत मागणी लक्षात घेऊन तिचा पुरवठा करणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. ते म्हणाले, ‘मला समजत आहे की आमचे परदेशी भागीदार लस विकसित करण्याच्या बाबतीत स्पर्धात्मक आहेत. म्हणून त्यांनी असे विचार व्यक्त केले आहेत, जे आम्ही निराधार असल्याचे मानतो. विशिष्ट क्लिनिकल माहिती आणि डेटा विचारात घेतल्यानंतर रशियाने ही लस विकसित केली आहे.’