SBI ची वॉर्निंग : ‘या’ व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध रहा ; अन्यथा अकाउंट होऊ शकते खाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी सोशल मीडियावर एक महत्वाची सूचना जारी केली आहे. SBI ने आपल्या खातेधारकांना एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध राहण्यास सांगितले आहे. कारण हा मेसेज ग्राहकांची फसवणूक करुन बँकिंग डिटेल्स काढून घेऊ शकतो. त्यामुळे तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते.

काय आहे मेसेज –

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हांला SBI कडून ट्रान्झॅक्शन किंवा OTP विषयी मेसेज येत असतील तर, सावध रहा कारण याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. हा मेसेज पहिल्यांदा ग्राहकांनी ओटीपी संबंधित माहिती देऊन सतर्क करतो. त्यानंतर ग्राहकाचा विश्वास जिंकल्यानंतर प्रत्यक्षात ओटीपी शेअर करायला सांगतो. हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सतत कोणत्याही लिंक सोबत येतो. ज्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये कोणतेतरी अ‍ॅप इंस्टॉल होते. या अ‍ॅपच्या मदतीने हॅकर्स फोनमधून ओटीपी चोरी करु शकतात.

SBI कडून सोशल मीडियावर मेसेज जारी –

SBI ने आपल्या ग्राहकांना OTP ची मागणी करणाऱ्या मेसेजविषयी सतर्क करताना म्हंटले आहे की , बँक कधीही तुमच्याकडे OTP विषयी माहिती मागत नाही. SBI ने याविषयी ‘बी कॉशियस, स्टे सेफ’ असे ट्विट आहे. तर व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाठवलेल्या मेसेजविषयी म्हंटले आहे की या मेसेजद्वारे ग्राहकांना नकली ऑफर दिली जात आहेत आणि OTP व्यवहारासाठी विचारले जात आहे.

सावधगिरीचा उपाय म्हणून ‘या’ नंबरवर संपर्क करा –

यावर सावधगिरीचा उपाय म्हणून SBI ने ग्राहकांना कार्ड, बँक खाती, बँक क्रेडेन्शियल किंवा ओटीपी याबद्दल कोणतीही माहिती शेयर न करण्याची विनंती केली आहे. जर तुम्हाला OTP संदर्भात किंवा संशयास्पद फसवणूक, एक्टिविटी, खाते किंवा कार्ड यांच्याविषयी माहिती शेयर करण्यासाठी मेसेज आला असेल तर 1-800-11110 9 या नंबरवर कॉल करू शकता असे आवाहन SBI ने ग्राहकांना केले आहे.