पुन्हा एकदा बोलला शाहिद आफ्रिदी, म्हणाला – ‘काश्मीर संघाचा कर्णधार व्हायचेय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडेच काश्मिर आणि भारताच्या पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह विधान करून चर्चेत आलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा असे काही बोलला आहे जे चर्चेचा विषय बनत आहे. आफ्रिदी आता एका व्हिडिओमध्ये हे बोलताना दिसत आहे की, मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे ही मागणी करतो की पुढच्या वेळी पाकिस्तान सुपर लीग आयोजित केली जाईल तेव्हा त्यात काश्मीरचा संघ देखील सहभागी केला जावा आणि मला माझ्या क्रिकेटच्या शेवटच्या वर्षात त्या संघाचे नेतृत्व करायचे आहे.

काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे
तो पुढे म्हणाला की, पीसीबीला मी विनंती करतो की या लीगची पुढील फ्रेंचायजी काश्मीरचीच असावी. यावर्षी पीएसएलमध्ये मुल्तान-सुलतान संघाचा भाग असलेल्या आफ्रिदीने म्हटले की, तो प्रतिभावान खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासही तयार आहे. तो म्हणाला की, येथे एक क्रिकेट स्टेडियम आणि क्रिकेट अकॅडमी देखील असली पाहिजे. मी ऐकले आहे की इथे १२५ क्लब आहेत आणि अशात एक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.

पीएम मोदींविरुद्ध केले होते वादग्रस्त विधान
शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह भाषा वापरुन वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर क्रिकेटर गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग, सुरेश रैना, शिखर धवन यांनी चोख प्रत्युत्तर दिले. शाहिद आफ्रिदीने हे विधान पीओकेमध्ये केले होते. पीएम मोदींविरोधात तो म्हणाला होता की, ते धार्मिक आजाराने ग्रस्त आहेत. कोरोनापेक्षा एक मोठा आजार मोदींच्या हृदयात आणि मनात आहे आणि तो रोग धर्माचा आहे. ते त्या आजाराबाबत राजकारण करत आहेत. आपल्या काश्मिरी भाऊ-बहीण व वडीलधाऱ्यांवर अत्याचार करत आहेत. त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल.