लपून-छपुन मोबाईलमध्ये पुन्हा ‘दस्तक’ देतंय TikTok

अहमदाबाद : वृत्तसंस्था – ३० जून रोजी भारत सरकारने बंदी घातलेले चिनी अ‍ॅप टिकटॉक पुन्हा मोबाईल मध्ये येत आहे. यावेळी अ‍ॅप स्टोअर किंवा गूगल प्ले स्टोअरऐवजी एका विशेष लिंकद्वारे थेट ब्राउझरमधून डाउनलोड केले जात आहे. ही लिंक निवडक मोबाइल फोनवर पाठवली जात आहे.

सुरत अहमदाबादमध्येही अनेकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. एका युजरच्या फोनमध्ये हे डाउनलोड आणि सक्रिय झाल्यानंतर त्याची पडताळणी केली. सायबर तज्ञ, एथिकल हॅकर्स आणि सायबर पोलिसही आश्चर्यचकित आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, कदाचित टिकटॉकने थर्ड पार्टीच्या मदतीने हेराफेरी केली असेल. सरकारी यंत्रणांनी त्वरित कारवाई केली पाहिजे.

जे आधीपासूनच टिकटॉकचे युजर आहेत, व्हिडिओ, फोटो अपलोड करत होते ते पुन्हा जोडले जात आहेत. हे व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, मेसेज व मेसेंजर वरून एपीके स्वरूपात पाठवले जात आहे. गूगलवर सर्च करणाऱ्यांना मेल येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच ते व्हॉट्सअ‍ॅपचा ऍक्सेस मागते आणि ओके केल्यावर अ‍ॅक्टिव्ह होते. मेसेंजरच्या लिंकमध्ये फेसबुकचा ऍक्सेस मागते. तुमच्याकडे आधीपासूनच हे दोन्ही अ‍ॅप्स नसतील, तर टिकटॉक डाउनलोड होणार नाही. यावेळी डाउनलोडर करणाऱ्यांना फोनचे सर्व ऍक्सेस द्यावे लागत आहेत. तर यावेळी टिकटॉकचे व्हिडिओ इतर सोशल मीडिया ऍप्सवर शेअर होत नाहीत.