‘या’ भारतीय मुलीनं कसं जिंकलं अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या मुलगी इवांकाचं ‘मन’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील मुलगी ज्योती हिच्या धैर्याची आणि हिंमतीची चर्चा अमेरिकेत पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी ज्योतीच्या धैर्याची प्रशंसा केली आणि तिची संघर्षमय कहाणी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली. दरम्यान, दरभंगाच्या सिरहूल्ली गावची ज्योती लॉकडाऊन दरम्यान आपल्या आजारी वडिलांना सायकलवर घेऊन गुडगावहून दरभंगाला पोहोचली. सुमारे 1200 किमीचा हा संघर्षमय प्रवास तिने धैर्याने पूर्ण केला.

एका माध्यमावर सुरु असलेली ज्योतीची कहाणी इव्हांका ट्रम्प यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटरवर शेअर केली. यापूर्वी, भारतात ज्योतिची संघर्षामय कहाणी सर्वांच्या पुढे आल्यानंतर अनेक लोक आणि संस्था तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. ज्योती इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. म्हणूनच, तिच्या अभ्यासामध्ये मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्योतीवर पुढील महिन्यात सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने चाचणीसाठी बोलवले आहे. ज्योतीने शुक्रवारी सांगितले की, तिला कॉल आला आहे. सायकलिंग फेडरेशनचे अध्यक्ष ओंकार सिंग यांनीही तिला शाबासकीची थाप देत आशीर्वाद दिला.

आठ दिवसांत गुडगावहून पोहोचली दरभंगा :
दरभंगाची 15 वर्षीय ज्योती जानेवारीत आपल्या आजारी वडिलांची सेवा करण्यासाठी गुडगाव येथे गेली होती. दरम्यान मार्चमध्ये लॉकडाऊन झाले आणि ती गुडगावमध्येच अडकली. आजारी वडिलांचे खिश रिकामे होते. वडील व मुलीला उपासमारीचा सामना करावा लागला. दरम्यान, पंतप्रधान मदत निधीतून एक हजार रुपये खात्यात आले. ज्योतीने आणखी काही पैशांनी जुनी सायकली विकत घेतली आणि तिच्या वडिलांना सायकलवर बसून गावी आणण्याचा निर्णय घेतला.

वडील सुरुवातीला सहमत नव्हते, पण मुलीच्या धाडसाला हो म्हणाले. आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ज्योतीने 1200 किलोमीटर सायकल चालविली आणि आपल्या वडिलांसोबत गुडगावहून दरभंगाच्या सिरहूल्लीला पोहोचली. दरम्यान, शुक्रवारी राधी पश्चिम पंचायतीतील पकटोला येथील डॉ. गोविंद चंद्र मिश्रा एज्युकेशनल फाउंडेशननेही ज्योतीला मोफत शिक्षण आणि वडील मोहन पासवान यांना नोकरीची ऑफर दिली आहे. फाउंडेशनने सिरहूल्ली निवासी मोहन पासवान आणि त्यांची मुलगी ज्योती कुमारी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे ठरविले आहे.