ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला, नंदीग्रामचा दौरा अर्धवट सोडून कोलकातामध्ये परतल्या (व्हिडिओ)

नंदीग्राम : वृत्तसंस्था –  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. नंदीग्राम येथे आज (बुधवार) हा हल्ला करण्यात आला. ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे निवडणूक अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. घटनास्थळावर व्हिडिओमध्ये काही सुरक्षारक्षक ममता बॅनर्जींना गाडीच्या मागच्या सीटवर उचलून ठेवताना दिसत आहे. त्यांना वेदना होत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

हल्ला झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माहिती देताना त्यांनी पायाला झालेली जखम दाखवली. यावेळी त्यांनी चार पाच लोकांनी माझ्यावर हल्ला केला असे सांगितले. यावेळी त्यांना हा सुनियोजित हल्ला होता का असे विचारण्यात आले. त्यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, नक्कीच हा सुनियोजित हल्ला होता. कारण माझ्याजवळ त्यावेळी कोणताही सुरक्षारक्षक नव्हता. ममता बॅनर्जी आपला निवडणूक अर्ज भरल्यानंतर आजचा मुक्काम नंदीग्राममध्ये करणार होत्या.

मात्र, त्या 130 किमी असलेल्या कोलकाता येथे परतल्या. पश्चिम बंगालची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात ममता बॅनर्जी यांचे पूर्वाश्रमीचे जवळचे सहकारी सुवेंदू अधिकारी निवडणूक लढवत आहेत.