मोबाईलमध्येच ‘मग्न’ असायची पत्नी, Facebook वर ‘फॉलोअर्स’ वाढल्यानं पतीनं संपवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जयपूरच्याअंबर पोलिस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासोबतच यूजर्सच्या संख्येत वाढ झाल्याने एका महिलेचा आपला जीव गमवावा लागला. वास्तविक, पत्नीचे फेसबुकवर 6000 हून अधिक फॉलोअर्स होते आणि ती सतत मोबाइलवर व्यस्त असायची. पत्नीच्या या सवयीला कंटाळून नवऱ्याने कट रचून पत्नीची हत्या केली.

जिथे रक्ताने माखलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी महिलेचा नवरा अयाज अहमद याला अटक केली आहे. या प्रकरणाचा खुलासा करीत अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे शाखा अशोक कुमार गुप्ता यांनी सांगितले की, दिल्ली महामार्गावरील देवीच्या मंदिराच्या रस्त्यालगत महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. महिलेची स्कूटी आणि हेल्मेट जवळच सापडल्याने तिची ओळख पटली.

ओळख लपविण्यासाठी डोके चिरडले :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्यानंतर तिची ओळख लपवण्याच्या उद्देशाने डोक्याला दगडाने ठेचले गेले. जयसिंगपुरामधील खोर येथील रहिवासी नैना उर्फ रेश्मा मंगलानी असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली असता कुटुंबीयांनी महिलेच्या पतीबद्दल शंका व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी दोघांनी गाझियाबाद येथे जाऊन आर्य समाजात लग्न केले होते. नंतर फैयाजच्या सांगण्यावरून रेश्माने निकाह केला.

दरम्यान, दोघांनाही 3 महिन्यांचा मुलगा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयाज अहमद आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. लग्नानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रेश्मा गेल्या 1 वर्षापासून पतीपासून विभक्त राहत होती. हत्येच्या उद्देशाने पतीने सलोखाच्या बहाण्याने तिला घेऊन गेला. आधी त्या दोघांनी मद्यपान केले आणि त्यानंतर आरोपीने डोके फोडून पत्नीला ठार मारले.

रेश्मा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायची. तिच्या यूजर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. अशा परिस्थितीत आरोपी पती आपल्या पत्नीवर संशय घ्यायचा, यामुळे ही घटना घडली.

फेसबुक पेज लाईक करा –