कोरोना रूग्णाची लाळ वापरून Boss ला ठार मारण्याचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   दक्षिण-पूर्व तुर्कीत अदाना येथील रहिवाशी असलेल्या बॉसला कोरोना रुग्णाची लाळ खरेदी करुन ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इब्राहिम उर्वेंडी असे या कार डीलरशिप करणाऱ्या मालकाचे नाव आहे. इब्राहिम यांनी तीन वर्षांपासून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

इब्राहिम यांनी सांगितल्यानुसार, “गाडीची विक्री केल्यावर कर्मचाऱ्याला २१५,००० तुर्की लीरा (२२ लाख रुपये ) दिले आणि पैसे ऑफिसमध्ये नेण्यास सांगितले. त्याच्याकडे माझी चावी सुद्धा होती, मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. त्यानंतर, मी त्याला बरेच वेळा फोन केला आणि मी त्यांच्यापर्यंत पोहचू शकलो नाही. दुसऱ्याच दिवशी त्याने म्हटले की, मला पैशाची गरज आहे आणि मी चोरी केली कारण मी कर्जबाजारी झालो आहे.”

“आरोपीने कोविड-१९ रुग्णाची लाळ ५०० तुर्की लिरा (५,०००) रुपये किंमतीत विकत घेतली आणि माझ्या पेयात मिसळण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या कर्मचाऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली,” असा दावाही इब्राहिमने केला.

कर्मचाऱ्याने धमकीचे पाठवलेले मेसेज इब्राहिमने पोलिसांना दाखवले. त्यात लिहले की, ‘मी तुम्हाला कोरोनाच्या विषाणूने मारू शकलो नाही. पुढच्या वेळी तुला गोळ्या घालू.’ इब्राहिम पुढे म्हणाले की, ‘अशी विचित्र हत्या करण्याचे तंत्र मी पहिल्यांदा ऐकले आहे. देवाचे आभार मानतो की, मी आजारी पडलो नाही. देव नेहमीच माझ्यासोबत असतो.’ दरम्यान, या कर्मचाऱ्यावर खुनाचा प्रयत्न आणि धमकी देण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.