मास्कबद्दल विचारला जाब ! डॉक्टरकडून झाली मारहाण, नगरमधील धक्कादायक घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मास्क न घातल्याबद्दल विचारणा करणाऱ्या महापालिकेच्या पथकातील एका कर्मचाऱ्याला चक्क डॉक्टरनेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर येथील प्रोफेसर कॉलनी चौकात शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी ही घटना घडली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या डॉक्टरला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी संबधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. पुरुषोत्तम सुंदरदास आहुजा (वय 51 रा. रासने नगर, सावेडी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. याप्रकरणी महापालिका कर्मचारी विष्णू सूर्यभान देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

तोफखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने विविध पथके नियुक्त करून मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. असेच एक पथक शुक्रवारी सायंकाळी प्रोफेसर कॉलनी चौकात कारवाई करत होते. त्यावेळी एक दुचाकीवर पती- पती दोघेही विना मास्क येताना दिसले. फिर्यादी देशमुख यांनी दुचाकीस्वाराला थांबण्याची सूचना केली. मात्र, दुचाकीस्वार डॉक्टरने न थांबता गाडी थेट देशमुख यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तुला मास्क दिसतो का अशी विचारणा करून त्यांनी देशमुख यांना चापट मारली. तेंव्हा दुचाकीस्वार डॉक्टर पळून जाण्याचा प्रयत्नात होता. मात्र पथकातील इतर सहका-यांनी दुचाकी अडवून त्याला पकडले. त्यावेळी तो सर्वांशी वाद घातला, दमबाजी आणि शिवीगाळ केली. पथकाने त्यांना नाव पत्ता विचारल्यावर ते स्वत: डॉक्टर असल्याचे सांगितले. त्यांना तोफखाना पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.