राजकीय योगायोग ! राज्याच्या इतिहासात पत्नी महापौर तर विरोधी पक्षनेते पद पतीकडे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव येथील महापालिकेच्या महापौर निवडीत सांगली महानगरपालिकेचा पॅटर्न वापरत शिवसेनेने अडीच वर्षातच सत्ता खेचून आणून महापालिकेवर भगवा फडकवला आहे. या घडामोडीनंतर विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत. जळगाव महापालिकेच्या २०१८ मध्ये निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत १५ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागेल.

विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका शिवसेनेचे सुनील महाजन पार पाडत आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप गटनेते भगत बालानी म्हणाले, शिवसेनेचा महापौर असेल तर आम्ही विरोधातच राहू, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही. महासभेत चुकीच्या कामांना विरोध केला जाईल. असेही ते म्हणाले.