हुल्लडबाजी आणि मद्यपींवर कठोर कारवाई केली जाणार : पोलीस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – होळी तसेच धुळवडीचा आनंद लुटताना गैरप्रकार करणारे आणि मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पादचारी आणि दुचाकीचालकांच्या अंगावर फुगे फेकणारे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी दिली.

धुलीवंदनाच्या दिवशी सहसा मद्यपान करून हुल्लडबाजी करत वाहने चालविली जातात. या दिवशी अनेकदा गंभीर स्वरुपाचे अपघातही होतात. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी वाहतुक व गुन्हे शाखेच्या पोलिसांना सुचना देण्यात आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी बंदोबस्ताच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेली या सुचना देण्यात आल्या आहेत. असे त्यांनी सांगितले.

साध्या वेशात गस्त
शहरातील महत्त्वाच्या चौकात तसेच रस्त्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांबरोबरच गुन्हे शाखेतील पथके साध्या वेशात गस्त घालणार आहेत. हुल्लडबाजी आणि सामान्यांना त्रास होईल, असे वर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.