‘लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’, अनिल देशमुखांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात कोरोनाच्या केसेस वाढताना दिसत आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नुकताच लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर देखील लॉकाऊन बद्दल अनेक चुकीचे मेसेज आणि फोटो तयार करून व्हायरल केले जात आहेत. यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता याची दखल घेतली आहे. अनिल देशमुख यांनी लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख ?

अनिल देशमुख यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, महाराष्टात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारीत करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिला 8 दिवसांचा अल्टीमेटम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि 21 फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना रुग्णांवरून चिंता व्यक्त करत लोकांनी नियम पाळले नाहीत, तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल असा इशाराही दिला. यासाठी त्यांनी 8 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पुढील आदेशापर्यंत राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई करण्यात येत आहे असंही त्यांनी जाहीर केलं.