पुण्यात Weekend Lockdown ची कडक अमंलबजावणी ! कात्रज आणि परिसरात पोलिसांकडून 400 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. अर्थात हे निर्बध १५ मे पर्यंत वाढवले आहेत. मात्र, हे निर्बंध आणखी वाढणार का हे अद्याप ठाऊक नाही. तसेच काही दिवसांपूर्वी पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आले. शनिवार आणि रविवारी निर्बंध हे आणखी कडक केले असताना देखील पुण्यातील कात्रज चौकामध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवसात 400 हुन अधिक लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी पुण्यात पार पडलेल्या बैठकीत पुण्यात आता आहे तशा पद्धतीनेच नियम सुरु ठेऊन आणखी कडक निर्बंध करण्याविषयी चर्चा झाली. पुण्यात वीकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असताना सुद्धा पुणेकर बाहेर फिरताना दिसतात. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या दत्तनगर चौक, कात्रज चौक आणि राजीव गांधी प्राणीसंग्रहालय चौक या तीन नाकाबंद्यांमध्ये पोलिसांनी दोन दिवसात 400 हुन अधिक विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या लोकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याची माहिती कात्रज पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. डी. घावटे यांनी दिली.

पुणे शहराचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी देखील शनिवारी व आज (रविवारी) पुण्यातील अनेक चौकात होत असलेल्या नाकेबंदीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.