सांगलीत 8 दिवसांचा कडक Lockdown जयंत पाटलांची घोषणा (व्हिडीओ)

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या 1 हजार 568 वर पोहचली आहे. सोमवारी 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. बुधवार (दि.5) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

जयंत पाटील म्हणाले, काल (सोमवार) सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1568 वर पोहचली तर 40 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाची चर्चा करुन सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत, असे पाटील यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करुन बाहेरुन ऑक्सिजन मिळवावा लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून ही साखळी तोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’ असेही आवाहन त्यांनी केले आहे.