इस्लामपूरमध्ये 10 सप्टेंबरपर्यंत कडक Lockdown

इस्लामपूर : इस्लामपूरमध्ये करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेत प्रशासनाकडून 2 ते 10 सप्टेंबरपर्यंत कडकडीत टाळेबंदी घोषीत करण्यात आली आहे. प्रशासन, व्यापारी, राजकीय नेते यांच्याकडून व्यापारी आणि नागरिकांना योग्य सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्वांची मते विचार घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

राजारामबापू पाटील नाट्यगृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरसेवकांनी इस्लामपूर शहरात टाळेबंदी जाहीर करण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बैठकीत प्रांताधिकारी नागेश पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले की, “टाळेबंदी काळाची गरज आहे. टाळेबंदीमुळे आपण करोना बाधितांचे प्रमाण शून्यावर आणू शकतो. शहरातील सध्याची स्थिती गंभीर आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.” नियम मोडणाऱ्यांवर दंडात्म कारवाई व्हावी, शासकीय कार्यालये, बॅंक यांना वेळेचे बंधन असावे, कार्यकर्त्यांनी प्रभागात लक्ष द्यावे, रुग्णांची सोय करावी, सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकरिता पर्यायी व्यवस्था करावी, शहराबरोबर आसपासच्या गावातही टाळेबंदी करावी, अशा सूचना केल्या.

प्रांताधिकारी नागेश पाटील म्हणाले की, “वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन शहरातील खासगी रुग्णालये अधिगृहीत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. उपलब्ध बेडची संख्या आनलाईन प्रसिद्ध करत आहोत. रुग्णवाहिका सेवा एका अधिकारी आणण्याचा विचार सुरू आहे. सर्वानुमते टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.