जिल्हा प्रशासनाचा निर्णय ! नांदेड जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, तसेच नांदेड जिल्ह्यातील करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ३१ मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यात अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नांदेड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे, हा निर्णय घेतला आहे. तर नव्या निर्णयामुळे संबंधित अनेक नागरिक बाहेर खात असल्याने त्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी या आस्थापनांना फक्त पार्सल सेवा रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्यानेही ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, असे निर्बंध लावण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी इटनकर म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही. तसेच नागरीकांनी या त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच या नवीन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली तर परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयांमध्ये ३१ मार्चपूर्वी शिथीलता देण्यात येईल,असे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.