Pune : पुण्यात उद्यापासून दिवसा जमावबंदी अन् रात्रीच्या वेळी 7 दिवस संचारबंदी ! उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय, जाणून घ्या काय चालू अन् काय बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आणि राज्यात देखील कोरोनानं कहरच केला आहे. पुण्यात तर दिवसेंदिवस कोरोनाच्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा वाढतच जात आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज (शुक्रवार. दि. 2 एप्रिल 2021) पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या आढावा बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता उद्यापासून पुण्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यापुर्वी रात्री 8 वाजल्यानंतर पुण्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनानं निर्बंध आणखी कडक करण्याचे धोरण अवलंबले आहे.

आरोग्य विभागाकडून पुण्यात लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव यापुर्वीच्या बैठकीत देण्यात आला होता. त्यास अजित पवार यांच्यासह इतर वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांनी विरोध दर्शविला होता. आज झालेल्या बेठकीत जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आणि निर्बंध आणखी कडक करण्याच्या भुमिका मांडली आहे. त्यामुळे आता पुण्यात सध्यातरी लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध अतिशय कडक करण्यात येणार आहेत. उद्यापासून म्हणजेच (शनिवार. दि. 3 एप्रिल 2021 पासून) सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान पुण्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद असणार आहेत मात्र नियोजित परिक्षा सुरळीत होणार आहेत. शहरातील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट, सिनेमा हॉल आणि मॉल हे 7 दिवसांसाठी लॉकडाऊन (पुर्णपणे बंद पण होम डिलिव्हरी सुरू राहील) करण्यात येणार आहेत. शहरातील पीएमपीएमएल बससेवा 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवस पुणे शहरात जमावबंदी म्हणजेच 5 पेक्षा अधिक लोक जमा होऊ शकत नाहीत.

भविष्यात गरज भासल्यास प्रशासनाकडून खासगी रूग्णालयातील 100 टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. कोरोना रूग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रशासनानं युध्दपातळीवर तयारी केली आहे. तरी काही ठिकाणी बेड्स उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर प्रशासनानं भविष्यात गरज भासल्यास खासगी रूग्णालयातील 100 टक्के बेड ताब्यात घेण्याचं ठरवलं आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषद –

* सांगली, सातारा, सोलापूरमध्ये परिस्थिती थोडी गंभीर आहे. तेथील कोरोना रूग्ण वाढत आहेत.
* पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट 32 टक्क्यांवर
* आगामी 2 दिवसांमध्ये नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा वाढणार
* आगामी 2 दिवसात 75 ते 80 हजार जणांचं लसीकरण करणार
* 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार
* 18 पेक्षा जास्त वयांच्या लोकांना आगामी 100 दिवसांत लस देण्याचा प्रयत्न
* आज पालकमंत्री अजित पवार तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांच्या उपस्थितीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत.

1. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आगामी 7 दिवस बंद. होम डिलिव्हरी सुरू राहणार
2. मॉल आणि सिनेमा हॉल आगामी 7 दिवस बंद.
3. सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे आणि पीएमपीएमल बस सेवा (अत्यावश्यक सेवा वगळून) आगामी 7 दिवस बंद.
4. आठवडे बाजार बंद असणार पण मंडई सुरू पण सोशल डिस्टेन्सिंग बाळगावी लागेल.
5. लग्न आणि अत्यंसंस्कार सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला (सभा, कार्यक्रम) परवानगी नाही.
6. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून 7 दिवस संचारबंदी लागू
7. हे सर्व निर्णय उद्यापासून लागू होणार असून ते पुणे शहर आणि जिल्हयासाठी आहेत. आगामी 7 दिवसानंतर पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. पुन्हा काही गोष्टी सांगण्यात येतील.

बैठकीत कोण काय भुमिका मांडली ते खालील प्रमाणे –

अजित पवार यांनी त्यांची भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, मी पण लॉकडाऊनच्या विरोधात आहे. पण संख्या ज्या गतीने आणि ज्या पध्दतीने वाढते आहे त्या पध्दतीने 100 टक्के खासगी हॉस्पीटलमधील बेड ताब्यात घेतले तरी बेड मिळणे कठीण आहे. लोक ऐकतच नाहीत. कडक निर्बंध घातले तरी लोक ऐकतच नाहीत. एखाद्या घरात कोरोना रूग्ण असेल तरी देखील त्या घरातील इतरजण गावभर फिरतात. काही उपयोग होत नाही. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही. त्यावेळी काय करणार.

दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील त्यांची भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, ससूनमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिका का आहे. अनावश्यक फिरणार्‍यांची संख्या अधिक आहे. लोकप्रतिनिधींनी काय केले पाहिजे. पोलिस फिरताना गर्दी कमी असते पण ते गेल्यावर लोक पुन्हा गर्दी करतात. लसीकरण वाढवले पाहिजे आणि कडक निर्बंध केले पाहिजे असे ते म्हणाले. तरूणांमध्ये संसर्ग वाढत असल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणले.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की, प्रशासनाची भुमिका लॉकडाऊन करा अशी असली तरी देखील लोकांना लॉकडाऊन नका आहे. त्यामुळे निर्बंध कडक करा तसेच काही खासगी हॉस्पीटल 100 टक्के कोविडसाठी घ्या. मतिमंद, दिव्यांग मुलांच्या लसीकरणाचा शासनाने निर्णय घ्यावा. फेसबुक पेज, सोशल मिडीयावर जनजागृती करावी. लोकप्रतिनिधींना माहिती मिळत नाही. लोकांना लॉकडाऊन नको आहे पण ते निर्बंध पाळत नाहीत. दरम्यान, सायंकाळी सहा नंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करणे चुकीचे होईल असे देखील त्यांनी भूमिका मांडली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, लॉकडाऊन करून उपयोग होणार नाही. मृत्यूदर कमी करणे यासाठी आपण काय करूशकतो तसेच प्रसार कमी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. लग्न सोहळे, दशक्रिया विधीसाठी मास्क आणि फेसशीट अनिर्वाय केले पाहिजे. रूग्ण किती आणि ऑक्सिजन बेड किती याचा ताळमेळ बसत नाही. औद्योगिक क्षेत्रात डोअर स्टेप लसीकरण केले पाहिजे अशी भुमिका त्यांनी मांडली. व्हेंटिलेटर बेड वाढवले पाहिजेत असेही ते म्हणाले. लॉकडाऊन करून उपयोग होणार नसेल तर ग्रामीण भागात ऑक्सिजन बेड वाढवले पाहिजेत अशी भूमिका आमदार राहूल कुल यांनी मांडली आहे.