धक्कादायक……दोन महिलांच्या मदतीने पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

सातारा (म्हसवड) : पोलीसनामा आॅनलाईन

दोन महिलांच्या मदतीने पाच वर्षांच्या चिमुरडीवर जवळच्याच नातेवाईकाने अत्याचार करुन मुलीला तिच्या गावी आणून सोडल्याचा धक्कादायक प्रकर माण तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी संबंधित नातेवाइकासह इतर दोन महिलांवर आरोपीला मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माण तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. यानंतर शुक्रवार, दि. १ जून रोजी रात्री साडेसातच्या सुमारास गावातील व्यायामशाळेजवळील स्मशानभूमी येथे रस्त्याकडेला पीडित मुलगी व तिच्या बहिणीला चारचाकी गाडीतून सोडून आरोपी फरार झाले. दरम्यान गावातील व्यायामशाळेजवळ बसलेल्या लोकांना लहान मुलगी ओरडत असल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने लोक गेले असता अंधारात एक मुलगी ओरडत विव्हळत पडली असल्याचे त्यांना दिसून आले. या बघणाऱ्यांमध्ये त्या पीडित मुलीचे वडीलही होते. त्यांनी तिला ओळखले व घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर मुलीला प्रचंड त्रास होतोय म्हणून आरोग्य केंद्रात घेऊन गेले. या ठिकाणी प्राथमिक तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख करीत आहेत.