राकट, दणकट मर्दानी “फर्जंद”

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

ब्रॅड पिट चा ट्रॉय असेल किंवा रसेल क्रो चा ग्लाडीएटर असेल हे ऐतिहासिक युद्धपट डोक्यात ठेवून जर फर्जंदच्या वाट्याला जाणार असाल तर मात्र घरीच बसा. आपल्या राजाचा, आपल्या मातीतला हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी हसत मुखाने बलिदान दिलेल्या असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाप्रती आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. दिग्दर्शक चित्रपटाच्या सुरुवातीलाच तसे नमूद करतो की, राजा शिवछत्रपतींच्या इतिहासाची तोंडओळख व्हावी यासाठी केलेला प्रयत्न. एकूणच नावाप्रमाणेच फर्जंद हा चित्रपट राकट, दणकट आणि जोशपूर्ण वाटल्याशिवाय राहत नाही.

कोंढाणा किल्ला स्वराज्यात घेण्यासाठी नरवीर तानाजी मालूसुरे यांनी दिलेला लढा. तो लढा देत असताना त्यांना आलेलं वीरमरण यामुळं स्वराज्यातील मावळ्यांना रक्त सळसळलेलं असताना राजांच्या मनात अजून एक खंत सलत आहे ती म्हणजे पन्हाळगड शत्रूपक्षात आहे. तो जोपर्यत पुन्हा आपल्याकडे येत नाही तोपर्यत जीवाला काही केल्या स्वस्थता नाही. याकरिता कुणाला मोहिमेवर पाठवयाच याचा विचार सुरू असतानाच त्यांच्या डोक्यात नाव येते ते कोंढाजी फर्जंद याचे. चित्रपटात ज्यापद्धतीने फर्जंद याला दाखविण्यात आले आहे ते पाहून अंगावर काटे येऊन आपल्याला स्फुरण आल्याशिवाय राहत नाही. लाडक्या राजाचा शब्द तळहातावर झेलत त्याच्यासाठी मरणाला एका पायावर तयार असणारी माणसे, त्याला कोंढाजी तरी कसा अपवाद असणार, तो मोहिमेसाठी तयार होतो. राजे सोबत किती मावळ्यांची तुकडी हवी असे जेव्हा विचारतात त्यावेळी फर्जंद ने दिलेले उत्तर आणि त्या उत्तराने चित्रपट गृहात होणारा टाळ्या शिट्ट्याचा आवाज हे खास अनुभवण्यासारखं आहे.

कोंढाजी त्याची तयारी, मावळ्यामधील संघर्ष, त्यांच्यातील एकोपा, भावबंध हे दिग्दर्शकाने चपखलपणे टिपले आहे. त्यामुळे मध्यतरापूर्वी काहीसा रेंगाळत जाणारा फर्जंद पुढे कमालीचा वेग घेतो. प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. विशेष उल्लेख करायचा झाल्यास पन्हाळगड फत्ते करण्यापूर्वी मावळ्यांची सुरू असलेली लढण्याची तयारी, त्यात अवघड कड्यावर चढण्याचा केलेला सराव प्रेक्षक पाहत असताना त्या पार्श्वभूमीवर मल्हारी, मल्हारी शिवबा आमचा मल्हारी हे गाणे वाजत राहते. हे दृश्य संपेपर्यंत अंगावरचा काटा काही केल्या जात नाही. असे अनेक प्रसंग चित्रपटात आहेत. यामुळे चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. सुरुवातीला कोंढाणा किल्ल्यावरील युद्धाचा प्रसंग असेल किंवा शेवटी पन्हाळगडावर झालेली अटीतटीची लढाई असेल याकरिता रसिकांनी चित्रपट बघावा. अभिनय, छायाचित्रण, कलादिग्दर्शन, संगीत, गाणी याबाबत देखील चित्रपट उजवा ठरला आहे. चिन्मय मांडलेकर याने साकारलेला छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत प्रसाद ओक, आणि फर्जंदची ठसठशीत, दणकट भूमिका साकारणारा अंकित मोहन यासर्वांचा अभिनय लक्ष वेधून घेणारा आहे.

– दिग्दर्शक – दिगपाल लांजेकर
* स्टार