Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमली विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाण याला अटक केली. त्यानंतर चिंकू पठाणचा पुण्यातील साथिदार राजू सोनावणे याच्या घरावर छापेमारी केली. त्यामुळे ड्रग्स पेडलरचे पश्चिम पट्ट्यातील पुणे आणि मुंबईमध्ये मजबूत जाळे असल्याचे समोर आले.

दक्षिण अमेरिकेतून कोकेन, भारताच्या उत्तरेकडील राज्यांमधून ब्राऊन शुगर, अफीम तर दक्षिणेकडील राज्यांमधून गांजा अशाप्रकारे देशाच्या कानाकोपऱ्यातून अमली पदार्थ महाराष्ट्रात सर्रासपणे येत आहे. पुणे आणि मुंबई सारख्या उच्चभ्रू तरुण, नोकरदार, सेलिब्रेटींपर्य़ंत वेगवेगळे व महगाडे ड्रग्ज पोहचवण्यात हे ड्रग्ज पेडलर तरबेज आहेत. परदेशातून येणारा मेफेड्रोन (एमडी) सारखा अमली पदार्थ मुंबईमार्गे पुण्यात दाखल होतो. हे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

ड्रग्स तस्करीसाठी मुंबईनंतर पुण्याला प्राधान्य
शहरांमध्ये तरुणांची वाढती संख्या लक्षात घेऊन मागील काही वर्षात अमली पदार्थाची तस्करी करणारे या शहरातील तरुणांना आपले लक्ष्य बनवत आहे. खासकरून महाविद्यालयीन तरुणांना ड्रग्सच्या जाळ्यात ओढले जात आहे. तसेच शहराच्या वेगवेगळ्या परिसरात होणाऱ्या पार्ट्यांमध्ये मागणीनुसार अमली पदार्थ पुरवले जातात. वेगेळ्या राज्यांमधून छुप्या पद्धतीने महाराष्ट्रत आणून विक्रीसाठी मुंबईनंतर पुण्याला प्राधान्य दिले जाते.

मागिल वर्षी 83 लांखांचा अमली पदार्थ जप्त
2020 मध्ये पुणे पोलिसांच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने आणि पोलीस ठाणे, गुन्हे शाखा यांनी केलेल्या करावाईत 83 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत 67 जणांना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. तर 2019 मध्ये सव्वा दोन कोटी रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करुन 109 जणांना अटक केली होती.

असा होतो अमली पदार्थाचा प्रवास
अमली पदार्थ तस्करांकडून या कामासाठी खासगी वाहनांचा वापर टाळला जातो. त्यांच्याकडून फळे, पालेभाज्या, धान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, प्रवासी जीप, कार, खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बसचा वापर केला जातो.

पश्चिम पट्टा बनतोय ‘सेन्सिटीव्ह बेल्ट’
नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, पश्चिम पट्ट्यातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगड हा अमली पदार्थ तस्करांचा ‘सेन्सिटीव्ह बेल्ट’ झाला आहे. परदेशातून येणारा अमली पदार्थ देशाच्या वेगवेगळ्या भागासह महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रात काही भागात अमली पदार्थाच्या फॅक्टरी असून त्याद्वारे सगळीकडे पोचवला जातो, हे कारवाईमध्ये आढळून आले आहे.