Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळं तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत 2020-21 वर्षासाठी कोर्टानं मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर आता राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे. आज नाशिकमध्ये क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली. यात राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमीकाव्यानं आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे एका विद्यार्थ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं एका उच्च शिक्षित तरुणानं तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, किशोर कदम (वय 25) असं या तरुणाचं नाव आहे. बोरगाव (तालुका चाकूर) येथील तो रहिवासी आहे. त्यानं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून यावर निर्णय घेता येणार नाही. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाचा लाभ देताना येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण प्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ हे पुढील सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळं आता पुढील सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.