शिक्षणमंत्र्यांना काळेझेंडे दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च शिक्षण संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश देणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी शिक्षणमंत्री यवतमाळात आले होते. पोलिसांनी एनएसयूआय व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस ललित जैन, यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजीक पटेल, आदित्य ताटेवार, अमित बिडकर, शोएब पठाण, शेख शब्बीर अशी आंदोलकांची नावे आहे. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेत काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांना प्रश्न केले. मोफत उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देता येईल का, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला व त्याचे चित्रीकरण केले. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करा, असे आदेश दिले. त्याच्या निषेधार्थ एनएसयूआय व युवक काँग्रेसने शिक्षणमंत्र्याला काळे झेंडे दाखविले. येथील ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यवतमाळात आले होते.

एलआयसी चौकाकडून विश्रामगृहाकडे शिक्षणमंत्र्याचा ताफा जात असताना एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखविले. हा प्रकार निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांनी कारवाई केली.