खराब रस्ते, वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

वाहतूक कोंडी ही शहरातील नागरिकांना भेडसावत असलेली सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई, ठाणे शहरामध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हे खड्डे बुजविण्यास अजून तरी दोन महिन्यांचा कालवधी लागणार आहे. रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेष म्हणजे शाळेतील मुलांना पाठदुखी व तत्सम त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे.

एकीकडे अभ्यासाचा वाढता ताण आणि दुसरीकडे दप्तराचे ओझे तसेच प्रवासासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलने यासंदर्भात हे निरीक्षण नोंदवले आहे. नवी मुंबई हे शैक्षणिक केंद्र असून येथे सध्या दोनशेहून अधिक शाळा, कॉलेज आहेत. या शाळा, कॉलेजातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील विद्यार्थी बस अथवा खासगी वाहनाने प्रवास करतात. परंतु, खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे या विद्यार्थ्यांना तासनतास पाठीवर दप्तराचे आझे घेऊन प्रवास करावा लागतो. याविषयी अधिक माहिती देताना स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. उर्केश शाह म्हणाले, प्रत्येक वयात विशिष्ट वजन उचलण्याची क्षमता असते. दप्तराचे वजन जास्तीत जास्त मुलाच्या वजनाच्या दहा टक्के असावे. म्हणजेच, विद्यार्थ्यांचे वजन १५ किलो असेल तर दप्तराचे वजन दीड किलोहून अधिक असू नये. प्री नर्सरी व नर्सरीला बॅगलेस, पहिली ते दुसरी दीड किलो, तिसरी ते पाचवी दोन किंवा तीन किलो तर सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना चार किलोपेक्षा अधिक दप्तराचे ओझे नसावे. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पाच किलोपेक्षा जास्त ओझे देता कामा नये.
[amazon_link asins=’B01FAVKZH6,B078W4TXQF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71eab07f-a468-11e8-9f19-cf387158443e’]
दप्तराचे वजन जास्त असल्यास मणके, स्नायूंची झीज होणे, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे अजार होऊ शकतात. सध्या खराब झालेले रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अशाप्रकारच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. ही चिंतेची बाब असून याकडे शासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.