विद्यापीठ वसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी

पोलिसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना 3 ऑक्टोबपर्यंत वसतिगृह सोडण्याची सूचना दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षेची तयारी करायची की वसतिगृहातील साहित्य घेण्यासाठी पुण्यात यायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच वसतिगृह सोडण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. पुढील वर्षांचे वसतिगृह प्रवेश राबवण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये वसतिगृहात राहत असलेल्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी 3 ऑक्टोबपर्यंत खोलीचा ताबा विद्यापीठ प्रशासनाकडे द्यावा. वसतिगृहाचा ताबा सोडणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांचे साहित्य वसतिगृह कार्यालय आणि सुरक्षा विभागाच्या देखरेखेखाली वसतिगृह सामान कक्षात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या परिपत्रकावर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे गावी गेलेल्या विद्यार्थ्यांचे साहित्य वसतिगृहातच आहे. आता अंतिम वर्षांची परीक्षा होणार असल्याने अभ्यास आणि तयारी करावी लागत आहे. त्यातच आता विद्यापीठाने 3 ऑक्टोबपर्यंतची मुदत वसतिगृह सोडण्यासाठी दिली आहे. एवढयाच कामासाठी पुण्यात यायचे का हा प्रश्न आहे. तसेच ऐन परीक्षेच्या काळात विद्यापीठाने वसतिगृहाचा ताबा सोडण्याची सूचना देणे योग्य नाही. त्यामुळे विद्यापीठाने ताबा सोडण्यासाठी मुदत वाढवावी, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, नव्या वर्षांच्या वसतिगृह प्रवेशांच्या दृष्टीने वसतिगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा ताबा सोडण्याची विनंती करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.