पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, महाविद्यालयांना दिले ‘हे’ आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी एक रकमी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये. दोन ते तीन हप्त्यात शुल्क भरण्याची मुभा द्यावी असे आदेश विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत.

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास सुरु केले आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास लावण्यापूर्वी संपूर्ण शुल्क जमा केल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे आदेश काढले होते. यापार्श्वभूमीवर शिवसेनेने शुल्क दोन ते तीन हप्त्यात घ्यावे यासाठी महाविद्यालयांना आदेश देण्याची मागणी विद्यापीठासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. तसेच आदेश न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शहर उपप्रमुख किरण साळी यांनी दिला होता.

पुणे विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क एक रकमी घेऊ नये, तसेच शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमुळे पालक, विद्यार्थी यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना एक रकमी शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही. सध्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहता विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.