गडचिरोलीत परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांना 15 दिवसांत परीक्षा देता येणार : उदय सामंत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी अग्रक्रमाने पूर्ण केली आहे. 17 हजार 229 विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार असून, 706 विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसणार आहेत. जे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत, त्यांना 15 दिवसांत परीक्षा देता येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विद्यार्थ्यांना सुरक्षित परीक्षा देता यावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. ऑनलाइन परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी घरूनच परीक्षा देतील, त्यासाठी इंटरनेट, मोबाइलसह सर्व आवश्यक तांत्रिक बाबींचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न बँक देण्यात येणार आहे. 50 टक्के अंतिम परीक्षेचे गुण व 50 टक्के अंतर्गत गुण यावरून निकाल घोषित केले जाणार आहेत. दरम्यान, गोंडवाना विद्यापीठातील पदभरती प्रक्रीया कोविडमुळे थांबलेली आहे.

आगामी काळात ती पूर्ण होऊन 12 बी ची मान्यता सुद्धा लवकरच मिळवण्यात यश येईल. विद्यापीठाच्या विकासाची प्रक्रीया केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दोन टप्प्यात राबविली जाईल. गोंडवाना विद्यापीठ नक्कीच विकासाच्या दिशेने झेप घेईल असेही सामंत म्हणाले. गोंडवाना विद्यापीठ देश-विदेशातील अभ्यासकांचे आकर्षणाचे केंद्र व्हावे. आदिवासी आणि वन यासाठीचे विशेष विद्यापीठ असल्याची तरतूद करण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.