पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
खराडी बायपास येथे नव्याने सुरु झालेल्या जलतरण तलावामध्ये पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना खराडीतील चाटे स्कुलनजीक असलेल्या खासगी जलतरण तलावात मंगळवारी (दि.१५) दुपारी घडली.
अविनाश पांडुरंग शिवशरण (वय ३२,रा.समता सोसायटी, वडगाव शेरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अविनाश हा विवाहीत असून तो चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्य़ालयात दस्त नोंदणीचे काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश हा त्याच्या मित्रांसोबत खराडी येथील खासगी जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. परंतू अविनाश याला पोहता येत नसल्याने तो तलावाजवळच उभा राहिला होता. काही वेळाने तो पाण्यात उतरला. कमी खोल असलेल्या पाण्यात तो उतरला असताना त्याला खोलीचा अंदाज आला नाही. तो खोल पाण्यात गेल्याने बुडाला. हा प्रकार त्याच्या इतर मित्रांच्या लक्षात आला. त्यानी जीवरक्षकांना ही घटना सांगितल्यावर या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या जिवरक्षकांनी त्याला बाहेर काढले. त्याला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी वाकड येथील एका क्लबच्या स्वीमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या गट्टूपती भार्गव या २४ वर्षीय आयटी अभियंत्याचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे भार्गव याने जीव रक्षक जॅकेट घातले असताना देखील त्याचा बुडून मृत्यू झाला होता.